Monday, December 16, 2019

शेती-माती

मातीचा प्रकार आणि दर्जा यानुसार पिकांची वाढ कशी होणार हे ठरत असते. त्यामुळे अन्य कोणत्याही क्षेत्राच्या तुलनेमध्ये मातीच्या दर्जाविषयी शेतीमध्ये अधिक महत्व दिले जाते. फ्रँकलिन  रूझवेल्ट (१९३६) यांच्या मते, मानवी संस्कृतीची वाढ ही सुपीक जमिनीच्या परिसरातच झाली. उलट अनेक बलाढ्य मानल्या जाणाऱ्या संस्कृतींचा र्‍हास हा खराब जमिनीमुळे झाला. कारण, संजीवांच्या जगण्यासाठी आवश्यक अन्नाची उपलब्धता करण्याचे महत्त्वाचे माध्यम माती हेच आहे.
Image result for fertile soil
सुपीक माती हाच संस्कृतीचा आधार
मातीच्या वरील काही इंचाच्या भागांमध्ये विविध सूक्ष्मजीव राहतात त्यांच्यामुळे या मातीला मातीचे फूल किंवा जीवंत माती असे म्हणतात. यातील असंख्य सूक्ष्मजीव सातत्याने कार्यरत राहून मातीतील विविध घटकांवर प्रक्रिया करत असतात. प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थ कुजवणे, कुजल्यानंतर त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करणे यासाठी सहजीवी आणि स्वतंत्रपणे काम करतात. यांच्या खाद्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ किंवा पिकांचे अवशेष सातत्याने उपलब्ध करणे आवश्यक असते. जमिनीचे जीवशास्त्रीय वैशिष्टे जपणे ही काळाची गरज ठरणार आहे. 
Image result for soil horizon
मातीचे फूल जपणे 
मातीची सुपीकता कमी होण्यामध्ये तापमानाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. कोरड्या आणि अधिक तापमान असलेल्या विभागातील माती खराब होण्याचा वेग अधिक असतो. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर ३०% इतके पिकाखालील क्षेत्र ही नापीक होण्याच्या दिशेने वेगाने जात आहेत. गेल्या ४० वर्षांमध्ये अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मातीचा ऱ्हास होण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. माती खराब होण्यामध्ये सलग एकाच प्रकारची पीके घेणे, सेंद्रिय खतांऐवजी रासायनिक खतांचा वापर वाढणे या मानवनिर्मित कारणांसोबतच पुर आणि दुष्काळाचाही मोठा वाटा आहे.
Related imageRelated image
माती ऱ्हासामागे मानव, निसर्गनिर्मित कारणे
मातीचा २ सेमी जाडीचा थर तयार होण्यासाठी सुमारे ५०० वर्षे लागतात. मातीतील वरच्या थरातील सूक्ष्मजीवांसाठी सेंद्रिय घटकांची उपलब्धता नियमितपणे टप्याटप्याने करत राहायला हवी. शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी कुजवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. शेळ्या-मेंढया किंवा गाई-म्हशी शेतीमध्ये कळपाणे फिरवल्यास अनावश्यक गवताचे प्रमाण कमी होण्यासोबतच त्यांच्या लेंडी-शेण-मूत्र यातून सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. बीजप्रक्रिया व जिवाणू संवर्धनाच्या वापरामुळे शेतीत उपयुक्त जीवाणूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचे उदाहरण म्हणजे सेलेम(इजिप्त) या वाळवंटसदृश भागाचे लागवडीयोग्य जमिनीत रूपांतर करण्यात यश आले आहे.
Image result for soil organic matter
मातीच्या सेंद्रिय घटकांच्या वाढीसाठी
अन्न द्रव्य योग्य प्रमाणात उपलब्ध राहण्यासाठी तसेच पिकांच्या चांगल्या वाढीसाठी जमीन नेहमी वाफसा अवस्थेत असावी. पिकांना योग्य प्रमाणात संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे. तुषार सिंचनाने पाणी देताना जमिनीची जलधारणशक्ति, पाणी झिरपण्याचा वेग, उपलब्ध पाणी आणि पीक वाढीच्या अवस्था विचारात घ्याव्यात.
Image result for sprinkler irrigation on farm
पिकांना पाणी देताना...?

Saturday, December 14, 2019

पवित्र करेंगे तेजपुर को आज गंगाजल से: Dunkirk of Criminal Justice System.


Image result for encounter



     ६ December २०१९ रोजी तेलंगणा पोलिसांनी बलात्काराच्या घटनेतील चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. तो किती खरा, किती खोटा हे त्यांनाच माहीत. पण या घटनेनंतर दोन प्रमुख प्रतिक्रिया आल्या:

१.सर्वसाान्यांकडून पोलिसांच्या या कृत्याचे स्वागत
 आणि
२. बुद्धिजीवी वर्गातून या घटनेचा निषेध/काळजी/कारवाईची मागणी इ. 

आता सर्वसामान्य लोकांनी पोलिसांचं कौतुक केलं, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि पोलिसांना राख्या बांधल्या. याचा अर्थ सर्वसामान्य लोकांना कोर्ट कचेरी इ द्वारे दिलेला न्याय आवडत नाही असा मुळीच नाही. तर असा न्याय खरंच दुरापास्त झालाय हे लोकांना उघड उघड दिसत आहे. निर्भया केसमधील आरोपींना अजून शिक्षा झालेली नाही. त्या घटनेला आता सात वर्षे पूर्ण झाली. आणि अजूनही त्यांना लवकरच शिक्षा होईल असं कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. आता त्यातला एक हरामी curative petition दाखल करणार असा म्हणतोय, आणि तो त्याचा कायदेशीर अधिकार आहे असही तोंड वर करून सांगतोय. माझ्याच डोळ्यासमोर दोन असे ("Innocent till proven guilty") व्यक्ती आहेत, ज्यांनी त्यांच्या बायकोला गळा दाबून मारलंय. अहो, शिक्षा तर लांब राहिली; साधं चार्जशीट सुद्धा दाखल झालं नाही. ठाणेदार साहेबांनी मॅटर मिटवून टाकला. ५-१० लाखात गुन्हा माफ! फैसला ऑन द स्पॉट. देख क्या रहे हो चंद्रकांत जी, ये करप्ट झालेल्या सडक्या व्यवस्थेची स्टाईल आहे. 

माझा मित्र धीरज एकदा मला म्हणाला की आपल्याकडे न्याय मिळेल याची किती ग्यारंटी? मी म्हणालो, बाबा मी जातीने वकील आहे, पण उद्या माझ्यावरच अन्याय झाला तर मला प्रामाणिक मार्गाने गेलो तर न्याय मिळेलच याची खात्री मलापण नाही. यातून मी फारच लेचापीचा वकील आहे, असा अर्थ काढून तुम्ही मोकळे होऊ नका. हे दाहक वास्तव आहे आपल्या व्यवस्थेचं. अरुण फरेरा सारखे शिकले सावरलेले लोक पण व्यवस्थेकडून न्याय मिळवू शकले नाहीत. 
Image result for justice

                                            

       आता प्रश्न आहे, की हैदरबादमधील एन्काऊंटर झाल्याने ही व्यवस्था सुधारणार का? तर असे २-४ encounter करून न्याय मिळणार नाही. आणि ते (एन्काऊंटर) उत्तरही चुकीचं आहे. पण अशा अंधारात दिवा न पेटवता, कोणीतरी एक हॅण्डग्रेणेड टाकला तर बिघडले कुठे! हा एक आपोआप घडलेला किंवा घडून आणलेला धमाका आहे झोपलेल्या व्यवस्थेसाठी. आता लवकरात लवकर सुधरा नाहीतर आज Hyderabad पोलिसांनी केला, उद्या प्रत्येकजण जर धमाका करत सुटला तर ना कायदा राहील ना तुम्ही. 

         त्यामुळे न्यायाधिशांना, वकिलांना या एन्काऊंटर बद्दल वाईट वाटणे साहजिकच आहे. अहो त्यांची सगळी मक्तेदारी मोडून निघाली ना. इगो हर्ट झाला ना राव. अहो, POCSO सारख्या कडक कायद्याअंतर्गत पण दीड लाख केस पेंडींग आहेत. मग हे डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देण्याची पद्धत (Adversarial system) बंद करा आणि डोळे उघडून गुन्हेगाराला पाहणारी व्यवस्था (Inquisitorial system) लवकर लागू करा. 

          हा एन्काऊंटर शेवटचा ठरावा असं वाटत असेल तर सत्ताधारी, विरोधी, न्यायव्यवस्था, आणि सर्व बुद्धिमान लोकहो एकत्र या आणि कोठ्यावधी पेंडिंग केसेस निकालात काढण्यासाठी कंबर कसायला सुरुवात करा. नाहीतर आपल्या व्यवस्थेचा इन्काऊंटर व्हायला फार वेळ लागणार नाही. 


Saturday, December 7, 2019

अनाथांचा नाथा तुज नमो!

     अनाथांचा नाथा तुज नमो!
x


           कुठल्याही सर्वसामान्य माणसाचे एक स्वप्न असते. चांगली नोकरी, घर-दार, कुटुंब वगैरे आणि हे सगळे मिळूनही तो सुखी असतोच असे नाही. मग ज्यांच्या नशिबात हे सुख नाही, लहानपणापासून त्यांना कसे बोलायचे, कसे चालायचे हे बोट धरून शिकवायला कुणी नाही आणि ज्यांचे आयुष्यच अनाथ आश्रमात गेले आहे, त्यांनी काय करायचे?

       आज माझा भाऊ योगेश याने  yotube वरचा एक व्हिडिओ मला पाठवला व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे आळंदी येथे एक 12 वर्षाचा मुलगा अगदी असह्य अवस्थेत राहतोय, लहानपणी आई वडील वारले चुलत्याने मारलं तर गुडघे फुटलेत पण समाजाने जी शिकवण दिली त्याची जान आणि संवेदनशील मन यातून या मुलाची भूमिका आपल्या लक्षात येते. त्याला शिवरायांच्या एका मावळ्यांन सहकार्याची हाक दिली आहे त्याचा कार्यास सलाम पण पुढे काय?

         भारतीय कायद्यानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर या अनाथ मुलांना अनाथ आश्रम सोडावा लागतो. त्यामुळे 18 वर्षानंतर अनाथाश्रमाच्या सुरक्षित भिंतीतून बाहेर पडल्यावर जायचे कुठे आणि जगायचे कसे? हे प्रश्न त्या मुलांना भेडसावत असतात. आपण विचार करायला पाहिजे आपण अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपले आई वडील आपल्याला पॉकेट मनी देत असतात काहींना कदाचित त्यापुढे देत असतील. पण या मुलांचं काय यांना जर योग्य मार्ग मिळाला नाही, तर ही मुले वाईट मार्गाला लागण्याची शक्यता असते. कारण 18 हे वय कायद्यानुसार सज्ञान होण्याचे असले तरी या मुलांना आयुष्यात काय करायचे, हा प्रश्न असतो. कारण त्यांचे 18 वर्षांपर्यंत ना शिक्षण पूर्ण झालेले असते, ना त्यांना कुठे नोकरी असते. त्यामुळे डोक्यावर छप्पर नाही आणि उत्पन्नाचे साधन नाही, अशा अवस्थेत ही मुले भरकटत जातात. विशेषत: मुलींचे आयुष्य तर काळजीचाच विषय ठरते. आज आईवडिलांच्या छायेत राहणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत मग ती 6 महिन्याची असो वा कितीही वर्षांची मग या मुली खरंच सुरक्षित असतील काय? क्राईम ऑफ इंडिया चा 2016 च्या सर्वेनुसार लहान मुलांशी संबंधित 106958 गुन्हे दाखल आहेत आणि दाखल झालेले वेगळेच. शिक्षणासोतच यांचा आरोग्याचं काय? भारताने 2019 च्या जागतिक उपासमार निर्देशांकात 117 देशांपैकी 102 वा क्रमांक मिळविला. कुपशित बालकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. युनिसेफ म्हणते भारतात 5 वर्षांखालील 69% मुलं ही फक्त कुपोषणामुळे मरतात.

      अनाथांचानाथ तुज नमोया उक्तीप्रमाणे महाराष्ट्र सरकार या मुलांच्या मदतीला धावून आले आहे. नुकताच महाराष्ट्र सरकारने या अनाथ मुलांना शिक्षणात आणि नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यामुळे अनाथ बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कारण कित्येक अनाथ मुलांना पुढे शिकण्याची इच्छा असते. पण अनेक अभ्यासक्रमात त्यांना प्रवेशसुद्धा मिळत नाही. त्यातून भरमसाठ फी भरणेही त्यांना परवडत नाही. लहानपाणापासून अनाथ म्हणून वाढल्याने, त्यांची आडनावेही नसतात. त्यामुळे त्यांची जातही त्यांना माहीत नसते. आपल्या देशात अनेक जातींना शिक्षणात, नोकर्‍यांमध्ये आरक्षण आहे. मात्र, या मुलांना जातच नसल्याने त्यांना या सवलतीचा लाभ घेता येत नाही.

   महाराष्ट्र सरकारच्या या एक टक्का आरक्षणाच्या निर्णयामुळे या अनाथ मुलांना पुढे शिकणे आणि सरकारी नोकरी मिळवणे शक्य होणार आहे. खरे तर, एक टक्का आरक्षण म्हणजे फार काही नाही. पण कुठेतरी सुरुवात तर झाली, असे म्हणायला हरकत नाही.

        आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी तुमची कागदपत्रे लागतात. आधार कार्ड, पेन कार्ड, रेशन कार्ड, यांची आवश्यकता असते. इतकेच काय, पण साधा मोबाईल फोन घ्यायचा, बँकेत खाते उघडायचे असले तरी या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय काहीही होत नाही. या अनाथ मुलांकडे ही कुठलीही कागदपत्रे नसतात. कारण घराचा पत्ता नसतो. जात माहित नाही. त्यामुळे 18 वर्षानंतर जरी अनाथाश्रम सोडवा लागला तरीही या सगळ्या समस्यांमुळे ही मुले स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी फार काही करू शकत नाही. आता नव्या कायद्यानुसार अनाथ आश्रम सोडताना त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीच्या रकान्यात अनाथ हीच त्यांची जात लिहिता येणार आहे.

      अनाथ मुलांना मदत म्हणून अनेकजण पुढे येतात, मात्र त्यांना दोन वेळचे जेवण आणि रहायची सोय झाली की झाले, असेच अनेकांना वाटते. पण ही मुलेही माणसेच आहेत आणि त्यांचीही काही स्वप्न असतात, याचा विचारही कुणी करत नाही. अनेक मुलांना उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असते. म्हणजे अभियांत्रिकी, वैद्यकीय, युपीएससी, एमपीएससी वगैरे. अनेक मुलांना वेगळ्या क्षेत्रात काही करायचे असते. उदा. कुणाला गाण्याची आवड असते, त्याला गायक बनायचे असते. खेळांची आवड असते, त्याला खेळाडू बनायचे असते. मात्र हा विचार करताना फारसे कुणी दिसत नाही. आज आपण आजूबाजूला नजर टाकली तरी कळेल की आहे कुणी अनाथ खेळाडू? अनाथ गायक? अनाथ सिने अभिनेता? अनाथ नेता? मला वाटते केवळ अन्न, वस्त्र, निवारा हीच गरज या मुलांची नाही. तर तुमच्या-आमच्या मुलांप्रमाणे त्यांचीही काही स्वप्न असतात. त्यादृष्टीने आपण त्यांना कशी मदत करू शकतो, याचाही विचार समाजाने आणि सरकारने करण्याची गरज आहे. कारण या मुलांचे पालकत्व समाजानेच स्वीकारायचे आहे. अशाच अनाथ पारधी समाजातील मुलांसाठी यशोधरा प्रकल्प आपला हातभार लावत आहे.