Maharashtra Times | Updated
पारधी समाजातील मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत, त्यांना शिक्षण मिळून ते समाजाच्या प्रवाहात यावेत, यासाठी कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथे यशोधरा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. मागील पाच वर्षांपासून दानशूर व्यक्तीकडून होणाऱ्या मदतीतून प्रकल्प सुरू आहे.
म. टा. प्रतिनिधी, नगर
पारधी समाजातील मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत, त्यांना शिक्षण मिळून ते समाजाच्या प्रवाहात यावेत, यासाठी कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथे यशोधरा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. मागील पाच वर्षांपासून दानशूर व्यक्तीकडून होणाऱ्या मदतीतून हा प्रकल्प सुरू आहे. परंतु, सध्या या प्रकल्पासाठी मदत मिळत नसल्याने प्रकल्प आर्थिक अडचणीत आला आहे.
जंगलात, पालांवर पारधी समाज राहतो. त्यात गुन्हेगारीचा शिक्का बसल्यामुळे समाज त्यांना जवळ करत नाही. गुन्हेगारीचा शिक्का पुसून या समाजातील मुलांना शिक्षण मिळविण्यासाठी येथील युवक ईश्वर काळे यानी पुढाकार घेतला. काळे यांनी आदिवासी युग प्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठानची स्थापना करून यशोधरा हा प्रकल्प २०१२ मध्ये उभारला होता. त्यासाठी बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने विकले होते. या प्रकल्पात ५० हून अधिक मुले निवासी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षापर्यंत समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे हा प्रकल्प व्यवस्थित सुरू होता. परंतु, या वर्षीपासून प्रकल्पासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या असून, या प्रकल्पासाठी आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे. मुलांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याबरोबरच मुलांची संख्या वाढून नवीन शिक्षक नेमणे, डिजिटल शाळा साहित्य, ग्रंथालय, ई-लर्निंग क्लासरुम सुरू करायचा आहे. परंतु, पैशांअभावी हे सर्व आता ठप्प झाले आहे. या संस्थेला सरकारी अनुदान नसल्याने सरकारकडून कुठलीही मदत केली जात नाही. सरकारकडून मदत झाल्यास हा प्रकल्प चांगला चालवून पारधी समाजातील मुलांना शिकविता येईल. सरकारकडून मदत होत नसेल तरी दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास हा प्रकल्प सुरू राहील. संस्थेत अन्नधान्य, वस्तू, कपड्यांची देणगी देऊ शकतात. संस्थेतील बालकांचे वार्षिक शुल्क भरून पालकत्व स्वीकारता येते, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख ईश्वर काळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment