कुछ तुफानी |
'वेलकम टू द रिअल इंडिया मॅडम |
अंत्यसंस्कारानंतरची राख, घरातला कचरा |
सभापती म्यॅडम |
डायरेक्ट ऍक्शन डे
५ ऑक्टोबरला आम्ही पुण्याहून गावी जायला निघालो. आमचं मूळ गाव, बारडगाव हे अष्टविनायकांतील सिध्दिविनायकाच्या सिध्दटेक पासून अवघ्या १५ कि.मी. च्या अंतरावर. त्यामुळे विस्तृत पात्र असलेल्या या भीमा नदीच्या किनारी वसलेलं हे "तीर्थक्षेत्र" म्हणजे घराची चाहूल देणारा एक महत्त्वाचा माईलस्टोन. यंदा झालेल्या पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या भीमेने प्रवासाचा सारा शीण दूर होईल या विचारातंच नदीकाठी असलेल्या झुणका-भाकरी स्टॉल्सपर्यंत आलो. नदीपूल ओलांडताना मात्र जे पाहिलं ते
आपल्यापैकी कुणालाही नवं नाही. तीच "पवित्र अडगळ' आणि तोच "सुवासिक दर्प"! तेव्हा आपसुकपणे यायची ती प्रतिक्रिया आलीच. नंतर पुढे एकदा पुण्याला जाताना तो पूल ओलांडताना सुनील म्हणाला, " याचं काहीतरी करूयात यार".
आता नेमकं काम करायचं हे घरीच ब्रेन स्टॉर्मिंग करूनही काही स्पष्टं होईना, आमच्या साधनाताई पंचायत समिती सभापती, त्यांनीही आपल्या परीने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला; पण आपल्या प्रशासनात असले विषय हाताळायची यंत्रणाच नसलेल्यामुळे हे काही जुळून येईना. तेव्हा आता यावर आम्हाला एकंच मार्ग दिसत होता तो थेट जाऊन हातानेच कचरा गोळा करायला सुरूवात करणे.
त्यानुसार आजचा दिवस ठरला आमचा 'डायरेक्ट ऍक्शन डे'. सकाळी लवकर उठून घरातली फावडी, घमेली, इ. ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये टाकली आणि त्याच ट्रॅक्टरवर स्वार होऊन मी, सुनील आणि माझा पुतण्या ऋषी सिध्दटेक कडे निघालो. ट्रॅक्टरने प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ आणि त्यात नदीकाठचे वाट लागलेले रस्ते. माझी अवस्था बघून सुनील माझी थट्टा करत म्हणाला 'वेलकम टू द रिअल इंडिया मॅडम!' फायनली ७:३० वाजता आम्ही पुलाशी पोहोचलो. साधनाताईनी आम्हाला तिथेच जॉईन केलं. आम्ही चौघांनी एका कडेने कचरा उपसायला सुरूवात केली. खुद्द सभापती मॅडम आणि कदम साहेब नदीत उतरली म्हंटल्यावर गावातली काही ओळखीची लोकं आली. मदतीला नाही, "साह्येब, सभापती म्यॅडम, अहो वकील म्यॅडम तुम्ही सगळे पहिलं बाहिर या बरं!" हे सांगायला. आम्ही आमचं काम सुरू ठेवलं. आमचं हे असं सगळं बघून मग गावकरी आणि पंचायतीने मिळून माच्छिमारांच्या मदतीने काम सुरू केलं.
एकीकडे हे काम चालू असताना आमच्यापासून केवळ २० फूट अंतरावर 'भाविक' मात्र निर्माल्य, पोतीच्या पोती भरून आणलेली अंत्यसंस्कारानंतरची राख, घरातला कचरा (सर्व प्रकारचा) पध्दतशीरपणे टाकत होती. त्यांच्या भावांध डोळ्यांना काहीही दिसत नव्हतं. दारूच्या बाटल्यांचा तर या कचऱ्यात ढीगंच लागला होता. कचरा तो कचराच सगळंच होतं त्यात.
आम्ही केवळ सुरूवात केली, काम अजूनही चालू आहे. याचा शेवट काय होईल आम्हाला आताच काही कळंत नाहीये. लोक खरंचच तुम्हाला वेड्यात काढतात, जेष्ठ लोक काळजीपोटी 'कशाला असली रिकमी कामं?' असं म्हणतात आणि तुम्हालाही अशा वेळी सेल्फ डाऊटही यायला लागतो, हे आज अनुभवलं.
आम्ही केलं ते योग्य की अयोग्य, यशस्वी की अयशस्वी, समंजस की बाळबोध हे काम कसं संपतंय यातूनच ठरेल.
लिहितानासुध्दा अंगात कणकण जाणवतेय. बाकी अंगणात उभा असलेला ट्रॅक्टर सतत आज केलेल्या 'कुछ तुफानी' ची आठवण मात्र करून देतोय.
- विनया बोरसे कदम
No comments:
Post a Comment